एसटीतील आधारकार्डवरील ज्येष्ठांची सवलत होणार बंद

117

श्रीरामपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून माफक दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना पासऐवजी महामंडळाकडून आधार क्रमांकाशी जोडलेले अत्याधुनिक ‘स्मार्ट कार्ड ’ दिले जात आहे.
जून २०१९ पासून ही सेवा सुरू आहे. स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१९ अखेर आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड असेल अशाच ज्येष्ठ नागरिकांना १ जानेवारी २०२० नंतर एसटीतून प्रवास करताना तिकिटात सवलत मिळणार आहे. स्मार्ट कार्डसाठी आधार नोंदणी न केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र प्रवास करताना पूर्ण तिकीट दर द्यावा लागणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी आधार नोंदणी केली नाही. तर त्यांना एसटीच्या तिकिटामध्ये दिली जाणारी सवलत बंद होणार आहे. नगर जिल्ह्यातील १२ आगारांमध्ये आतापर्यंत १ लाख १५०० ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. ५० हजारांहून अधिक ज्येष्ठांना ‘स्मार्ट कार्ड’ चे वितरण झाले आहे. उर्वरित स्मार्टकार्ड ज्येष्ठांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंळडाने मोहीम गतिमान केली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग, महात्मा गांधी समाजसेवा, आदिवासी सेवक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त नागरिक तसेच अधिस्वीकृती पत्रकारांना मोफत तसेच सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी पास दिला जातो. हा पास साध्या पद्धतीचा होता; मात्र डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल करणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाकडून साध्या पासऐवजी अत्याधुनिक स्मार्ट कार्ड दिले जात आहे.

या कार्डवर बस पासधारकाचे नावासह बसचा प्रकार, प्रवासाची मुदत अशा सर्वच गोष्टी नमूद केल्या जात आहेत. हे कार्ड संबंधित सवलतधारकाच्या आधार क्रमांकाशी जोडले जात आहे. ५५ रुपये नाममात्र शुल्क घेऊन हे कार्ड दिले जात आहे.

जिल्ह्यातील १ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी आधार नोंदणी केली आहे. ५० हजारांहून अधिक नागरिकांना कार्ड पोहोचली आहेत. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आधार नोंदणी करणे गरजेचे आहे. स्मार्ट कार्डसाठी आधार नोंदणी न केल्यास ज्येष्ठ नागरिकांना १ जानेवारी २०२० पासून एसटीतून प्रवास करताना तिकीट दर पूर्ण द्यावा लागणार आहे. त्यांना जुन्या पासवर तिकीट दराची सवलत मिळणार नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा