दिल्ली,२१ सप्टेंबर २०२२ : कॉमेडियन एक्टर राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. १० ऑगस्ट रोजी जिम मध्ये वर्कआउट करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ४१ दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढल्यानंतर आज राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं.
माध्यमांच्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी त्यांच्या मेंदुचे सिटीस्कॅन केले तेव्हा मेंदूच्या एक भागात सूज दिसून आली, त्यांचे मोठे भाऊ सीपी श्रीवास्तव यांनी सांगितले की मेंदूला सूज आल्याने तिथे पाणी आढळले आहे, डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते.
राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार होते, ते अनेक लोकप्रिय टीव्ही शो चा भाग राहिले आहेत, राजू श्रीवास्तव शक्तिमान, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो, बिग बॉस, या शोचा हिस्सा राहिले आहेत, त्यांनी बिग ब्रदर, मै प्रेम की दिवानी हु, बॉम्बे टू गोवा, बाजीगर, मैने प्यार किया, यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.
लोकांना खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर त्यांच्या सामान्य प्रेक्षकांसोबत राजकीय मान्यवरांनी सुद्धा शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. तसेच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शोक व्यक्त केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव