डोंबिवली, १ सप्टेंबर २०२०: डोंबिवली शहरात आता सर्व गोष्टी या कमी जास्त प्रमाणात सूरू झाल्या आहेत. डोंबिवलीतील भावे सभागृहात अनेक वर्षांपासून कल्याण तहसील अंतर्गत सेतू सुविधा उपकेंद्र चालवले जात होते. मात्र ते आता बंद केले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे कल्याण तहसीलदार कार्यलयासमोर सेतू सुविधा उपकेंद्र सुरु करण्याची मागणी करत धरणे आंदोलन केले.
या केंद्रातून उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अधिवास दाखला, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असणारे नागरी प्रमाणपत्र या ठिकाणाहून मिळत असे. त्यामुळे नागरिकांना याचा फायदा होत होता. मात्र हे उपकेंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना दाखले काढण्यासाठी कल्याणच्या प्रमुख सेतू केंद्रात जावे लागत आहे.
भावे सभागृहातील सेतू केंद्र सुरू करण्याबाबत वंचित आघाडीतर्फे अनेक निवेदने करण्यात आली. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन केले. कोरोनाच्या या परिस्थितीत नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळण्यासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखल्यासाठी हे सेतू केंद्र सोयीसकर होते. त्यामुळे हे कार्यालय सुरू करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे