राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलैमध्ये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

औरंगाबाद, ३०जून २०२३ : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. छोटेखानी मंत्रिमंडळाची स्थापना केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे वारंवार सांगण्यात आले. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये संधी हुकलेले अनेक आमदार मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. काहींनी तर वारंवार मंत्रिमंडळ विस्तार होणार या घोषणांमुळे सूट ही शिवून ठेवले आहेत. परंतु अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या वक्तव्यामुळे मात्र इच्छुक आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी अनेकदा दिल्लीवाऱ्याही झाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लांबणीवरच पडला. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते दिल्लीला गेले होते. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खूशखबर दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात दिल्लीला जाऊन भेट घ्यावी लागते.

राज्याच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करावा लागतो. अनेकवेळा त्यासंदर्भातील बैठकाही असतात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारही करायचा आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतीलच. मला वाटते जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू.केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा आपआपसात काहीही संबंध नाही. केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे आम्हाला माहितीही नाही. आम्हाला राज्याच्या विस्तारात जास्त रस आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल दोन महिन्याने छोटेखानी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये मंत्रिमंडळाची आस बाळगलेल्या अनेकांचा हिरमुस झाला. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जुलैमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितल्यामुळे, अनेकांच्या अशा पुन्हा एकदा पल्लवी झाल्या आहेत. मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागावी म्हणून भाजपमधील डझनभर आमदार इच्छुक आहेत. तर शिवसेनेचे आणि मित्र पक्षांचे ही अनेक आमदार मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा