अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२०: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. यंदा शेतकऱ्यांचा परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. यासाठी उद्धव ठाकरे यांनी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पाहणी देखील केली होती.

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते. बैठकीदरम्यान, राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनहीही रक्कम दिली नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांना मदत पॅकेज केव्हा जाहीर होणार यावरून ठाकरे सरकारवर विरोधकांकडून वारंवार टीका करण्यात येत होती. त्यात मंत्रिमंडळाची होणारी बैठक देखील रद्द झाल्यानं शेतकरी देखील निराश झाले होते.

सरकारच्या आतापर्यंतच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झाल्याची माहिती समोर आलीय. या पार्श्वभूमीवर ‘एसडीआरएफ’च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरसाठी ६५०० रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा