जालना, दि.१३ जून २०२०: महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली असून राज्य सरकारला कोरोनावर उपाययोजना करण्यात शंभर टक्के अपयश आलेले आहे, असा थेट आरोप माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे.
केंद्रातील भाजप प्रणित नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सरकारच्या कामगिरीबाबत माजी मंत्री
आ. लोणीकर यांनी शुक्रवारी ( दि. १२) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की, केंद्र सरकारने कोरोनाच्या संकट काळात महाराष्ट्र सरकारला २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत केली आहे. अन्नधान्यासाठी ४ हजार ५९२ कोटी रुपयांची मदत केली आहे. १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे आणि २० हजार कोटींचे पॅकेज अशी भरीव मदत केंद्र सरकारने महाराष्ट्राला केलेली आहे.
२ लाख ७८ हजार कोटी रुपयांची मदत महाराष्ट्राला विविध योजनांमधून महाराष्ट्राला दिली आहे, असेही लोणीकर म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने कोरोनावर उपाय योजना करण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करणे आवश्यक होते, ते झालेले नाही. मजूर पाचशे ते एक हजार किलोमीटर पायी आले. त्यांना जेवण्याची, राहण्याची व्यवस्था करण्यात आली नाही.त्यांना गावात कोंडण्यात आले. शाळेत ठेवण्यात आले. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली नाही. यामुळे आता गावागावात कोरोना गेलेला आहे.
सरकारच्या हातात आलेली आकडेवारी ९७ हजार इतकी असली तरी एक लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. सरकारला यात अपयश आलेले असून त्यांनी आता शहाणे व्हावे आणि कोरोनावर पॅकेज द्यावे. बारा बलुतेदार आहेत,शेतकरी आहेत यांना पॅकेज देण्यात यावे. या घटकांना आता मदतीची खरी गरज असल्याचे लोणीकर म्हणाले.
न्युज अनकट प्रतिनिधी: