अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 10 हजार कोटींचं अर्थसहाय्य

मुंबई, 14 ऑक्टोंबर 2021: राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या काळात अतिवृष्टीमुळं शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नियोजित सर्व दौरे रद्द करून तात्काळ अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला अधिकची मदत देण्यात यावी अशी मागणी केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले.  या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून  जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15  हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.  झालेले नुकसान भरून न येण्यासारखे असले तरी राज्यसरकार कोणत्याही परिस्थितीत अतिवृष्टी व पूरग्रसत्तांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास वडेट्टीवार  यांनी व्यक्त केला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा