अपयश लपविण्यासाठी राज्य सरकारची दडपशाही : जगदीश मुळीक

पुणे, ४ नोव्हेंबर २०२०: सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार दडपशाही करीत असल्याची टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.पत्रकार अर्णव गोस्वामी यांना आज सकाळी राज्य सरकारने अवैध प्रकारे अटक केली. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने टिळक रस्त्यावरील अभिनव चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, सरचिटणीस गणेश घोष,राजेश येनपुरे, दीपक पोटे, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, संदीप लोणकर सहभागी झाले होते.

मुळीक पुढे म्हणाले, ‘पालघर येथील साधूंची हत्या आणि अभिनेता सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात अर्णव गोस्वामी यांनी स्पष्टपणे आणि ठामपणे प्रश्‍न विचारून महाविकास आघाडी सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले. म्हणून सूडबुद्धीने सरकारने गोस्वामी यांना अटक केली. गेल्या काही दिवसांत पत्रकारांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवून अवैध पद्धतीने अटक करण्यात येत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आणि ४५ वर्षांपूर्वीच्या आणीबाणीची आठवण करून देणारी आहे. राज्यात आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण करणार्‍या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो.’

यावेळी शहर पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा