राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे प्रांतांना निवेदन

माढा, ११ डिसेंबर २०२०: पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार व अधिस्वीकृती धारक पत्रकार असा भेदभाव केला जात आहे. तो अन्यायकारक असून सक्रिय पत्रकारिता करणाऱ्या सरसकट सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती धारक म्हणून मान्यता द्यावी, प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी, कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लस पत्रकारांसाठी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी, शासकीय रुग्णालयात अधिस्वीकृती धारक असो अथवा नसो पत्रकारांमध्ये भेदभाव न करता सर्व पत्रकारांना मोफत आरोग्य सुविधा व औषधोपचार करण्याबरोबर विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ माढा तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन बांधून मिळावे, सर्व शासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष स्थापन करावे, यूट्यूब न्यूज चॅनेलची अधिकृत नोंदणी करून त्यांना पत्रकारिता क्षेत्रात सामावून घ्यावे, प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून हक्काचे घर देण्यात यावे, वयोवृद्ध पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी, शासकीय नोकऱ्यांमध्ये पत्रकारांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, राज्यातील शासकीय भूखंड पत्रकार बहुउद्देशीय संघांना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, प्रत्येक तालुका व जिल्ह्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र शासकीय विश्रामगृह उभा करावे, राज्यात वाळू माफिया व अवैद्य व्यवसायिक यांच्याकडून पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जात पडताळणी दाखल्यासाठी घातलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या असे निवेदनात नमूद करण्यात आले.

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार, जिल्हा अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुहास कांबळे, जिल्हा संघटक अशोक खारे, जिल्हा उपाध्यक्ष शफिक शेख, माढा तालुकाध्यक्ष अंकुश आतकर, कार्याध्यक्ष वसंत कांबळे, उपाध्यक्ष अरबाज पठाण, कालिदास जानराव, सचिव बाबाफरीद पठाण, राहुल धोका, श्रीनिवास बागडे, हनुमंत मस्तूद, हनुमंत जाधव उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा