बारामती, ३ ऑगस्ट २०२० : उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवस बारामती मध्ये मुक्कामी आहेत.पवार यांनी तालुक्यातील विकास कामांची पाहणी केली यावेळी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराचे व स्वेच्छा निवृत्तीचा प्रश्ना संदर्भात पवार यांची भेट घेतल्यावर मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्याची माहिती एसटीच्या संघटनेचे सचिव हनुमंत ताटे व केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
बारामतीमध्ये आज एसटी संघटनेचे सचिव हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आज पवार यांची भेट घेत त्यांना एसटीच्या कर्मचारी व त्यांच्या थकीत पगाराबाबत निवेदन दिले आहे . एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा झाली असून, येत्या चार- पाच दिवसात याविषयी मुंबईत बैठकीचे आयोजन करणार असल्याची हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी कामगारांच्या बिकट झालेल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष घालावे व एसटी महामंडळास दोन हजार कोटी आर्थिक साहाय्य करावे, यासाठी या आधीही मान्यताप्राप्त संघटनेने पत्र व्यवहार केलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी