पुणे, दि. १० जुलै २०२०: पुणे व मुंबई ही शहरे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामधील सर्वात जास्त कोविड -१९ प्रभावित शहरांमध्ये आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर पुणेकरांनी लॉक डाऊन संपलेच असे गृहीत धरून सर्रासपणे रस्त्यावर फिरण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान लॉक डाऊन मधील कोणत्याही नियमांचे पालन पुणेकरांकडून केले गेले नव्हते. मास्क न वापरणे सामाजिक अंतर न ठेवणे यांसारख्या नियमांना पुणेकरांनी गेल्या काही दिवसांपासून धाब्यावर बसलेले दिसत आहे. इतकेच काय तर पुण्याच्या महापौरांना देखील कोविड -१९ ची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउनची घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलैपासून पुढचे १५ दिवस लॉकडाउन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे. पुण्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १३ जुलैपासून हे कडक लॉक डाऊन सुरू होणार आहे. ते पुढील दोन आठवड्यापर्यंत कायम राहील. यादरम्यान सार्वजनिक ठिकाणावर गर्दी न करणे, दुकाने उघडी ठेवण्याबाबत निर्बंध, निष्कारण घराबाहेर न जाणे यांसारख्या अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. “करोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता. दरम्यानच्या काळात, पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३० हजारांकडे गेली आहे. यापैकी १३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर ९०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसागणिक पुणे आणि पिंपरीमधील करोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी