आजच रात्री १२ पासून पुण्यामध्ये कडक लॉकडाऊन

पुणे, दि. १० मे २०२०: तिसरे लॉकडाऊन घोषित होताना केंद्र सरकार व राज्य सरकारने काही शिथिलता देत लॉकडाऊन सुरू केले होते. परंतू पुणेकरांनी याचा गैरसमज करत रस्त्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या लॉकडाऊन शिथिलतेला विरोध देखील केला होता. पुण्यातली होणारी गर्दी पाहता प्रशासनाने आता नियम आणखीन कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पुणे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे
याआधी पुणे महापालिका क्षेत्रामधील ६९ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरिता असलेली दुकाने सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा. पर्यंत उघडी राहतील असे निर्देशित करण्यात आले होते. मात्र क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सदरच्या सेवा देणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी सेवा घेतांना आणि देतांना सामाजिक अंतराचे पालन करणे यासारख्या महत्वाच्या बाबींचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविणे आवश्यक असल्याने शेखर गायकवाड (आयुक्त, पुणे महानगरपालिका) यांनी दि. ११ मे २०२० मध्यरात्री १२ पासून ते १७ मे २०२० पर्यंत या क्षेत्रामधील दवाखाने वगळता अन्य सर्व दुकाने आता बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यंत आवश्यकता भासल्यास दुध आणि भाजीपाला तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता घरपोच किंवा या क्षेत्राच्या आत मोठ्या मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचे पालन करून उपलब्ध करून दिले जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा