बारामतीसह पाच तालुक्यातील वादळी पावसाचा वीजयंत्रणेला तडाखा

बारामती : कोरोना विषाणूच्या सावट असताना बारामती, भोर, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात रविवारी (दि. १९) रात्रीच्या सुमारास वादळी पावसाच्या थैमानात वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. यामध्ये सुमारे ९५ पेक्षा अधिक उच्च व लघुदाबाचे वीजखांब जमीनदोस्त झाले. बारामती शहरासह २६८ गावांमध्ये
वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी अविश्रांत दुरुस्ती काम करून आज सकाळपर्यंत ९० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत केला तर उर्वरित भागांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.

रविवारी रात्री ७.३० ते १० वाजेदरम्यान बारामती, भोर, इंदापूर, दौंड,
पुरंदर तालुक्याच्या विविध भागात प्रचंड वादळासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उच्च व लघुदाबाच्या ९५ पेक्षा अधिक वीजखांब व तारा जमीनदोस्त झाले. बारामती शहरासह सुमारे २६८ गावांमधील सुमारे १ लाख ३९ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

रविवारी रात्री अस्मानी संकटाला सामोरे जावे लागले. पावसाचा जोर ओसरताच
रात्री वाहने, मोबाईल व बॅटरीच्या प्रकाशझोतात या पाचही तालुक्यामध्ये ४६ अभियंते, ३९० जनमित्र आणि कंत्राटदारांचे कर्मचारी एकाचवेळी
वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु केले. काही ठिकाणी जनमित्रांनी स्वत:च वीजयंत्रणेवर पडलेल्या फांद्या काढणे, वीजतारांना अडकलेले पातळ पत्रे, बॅनर्स काढणे, वीजखांब उभारणे, वीजतारा ओढणे आदी सर्व कामे करून
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी योगदान दिले.

बारामती शहर व एमआयडीसीमधील २४ वीजवाहिन्यांची वीज खंडित झाल्याने रात्री
दहाच्या सुमारास संपूर्ण शहर अंधारात गेले. युद्धपातळीवर दुरुस्ती काम करून केवळ एक तासामध्ये बारामती शहराचा वीजपुरवठा पुर्ववत केला तर पहाटे ३ वाजेपर्यंत उर्वरित एमआयडीसी व लगतच्या भागातील वीजपुरवठा सुरळीत
करण्यात आला.

                                                                                                प्रतिनिधी -अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा