महावितरणची धडक कारवाई; राज्यात एका महिन्यात ११ कोटी रुपयांची वीजचोरी उघड

मुंबई, १३ जानेवारी २०२३ :महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने डिसेंबर २०२२ या एका महिन्यात केलेल्या धडक कारवाईत राज्यात वीजचोरीच्या ८७९ प्रकरणात ११ कोटी ६९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या ६३ भरारी पथकांनी कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली. महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. वीजचोरीशिवाय इतर अनियमितता असलेल्या एकूण ५३९ प्रकरणांमध्ये १३ कोटी ६७ लाख ६० हजार रुपयांची वीजदेयकेही देण्यात आली.

वीजचोरी पकडलेल्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. पुण्याजवळ वाघोली येथे भरारी पथकाने धाड टाकली असता दोन स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली. त्यांना १ कोटी ४४ लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले. दोन्ही औद्योगिक ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ अन्वये वीजचोरी फिर्याद दाखल करण्यात आली. उल्हासनगरमध्ये एका औद्योगिक ग्राहकावर धाड टाकल्यावर वीजचोरी उघडकीस आली. त्या ग्राहकास ३१ लाख ६५ हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल दिले. जालना जिल्ह्यात एका स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली व संबंधितांना ५१ लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले. तसेच त्यांच्या विरोधात वीजचोरीची फिर्यादही दाखल करण्यात आली. अशा रितीने इतर अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.

दरम्यान, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कंपनीच्या सर्व मुख्य अभियंत्यांना वीजचोरी रोखण्यासाठी आक्रमकपणे कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. कंपनीच्या भरारी पथकाखेरीज स्थानिक कर्मचाऱ्यांनीही सजगपणे वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्याचा व कारवाई करण्याचा आदेश त्यांनी दिला. प्रत्येक सर्कल पातळीवर याबाबत पाठपुरावा करण्याचाही आदेश त्यांनी दिला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा