ऑनलाइन वर्गात प्रवेश घेऊ न शकल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

केरळ, दि.४ जून २०२०: केरळमधील इयत्ता नववीत शिकत असलेल्या देविकाला ऑनलाइन वर्गात प्रवेश घेता न आल्यामुळे तिने ‛मी जात आहे’ असा संदेश देत आत्महत्या केली. ती केवळ १४ वर्षाची मुलगी होती.याबाबत एका संघटनेने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. ती सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

गरीब कष्टकरी वर्गातून येणारी ही मुलगी. तिचे वडील रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. देविकाला शिक्षण घेण्याची खूप इच्छा व आवड होती. कुटुंबातील एकंदरीत परिस्थिती ही बिकट असल्यामुळे तिच्या घरच्यांना स्मार्टफोन व इंटरनेटसारख्या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. आणि अशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नैराश्याच्या भावनेत जाऊन टोकाचे पाऊल उचलत तिने आत्महत्या केली. ही घटना सोमवार १ जून रोजी घडली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे केरळमधील व देशभरातील शाळा, कॉलेज बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन वर्ग चालू करण्यात आले आहेत. ही केवळ देविकाचीच परिस्थिती नाही तर बहुतेक विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे, ज्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय नाही. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा खूपच अभाव आहे आणि बहुसंख्य ठिकाणी तर काहीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसत आहे.

“दिशा विद्यार्थी संघटना” देविकाच्या या संस्थागत हत्येचा तीव्र निषेध करत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सुविधा उपलब्ध करून न देता सरकारांमार्फत ऑनलाइन शिक्षण थोपवले जात आहे, आणि विषम संधींना अजून विषम केले जात आहे. ऑनलाइन सुविधांना सरकार प्रत्यक्ष शाळा कॉलेजात शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाला पूरक नाही तर पर्याय म्हणून पुढे ढकलत आहे जेणेकरून शिक्षणात सरकारची जबाबदारी कमी व्हावी आणि धंदा वाढावा. त्यामुळे दिशा विद्यार्थी संघटना ऑनलाइन शिक्षणाच्या या पद्धतीला जाहीर विरोध करत आहे. ही हत्या म्हणजे विद्यार्थ्यांना आपले भवितव्य रोखण्याचा मार्ग आहे असे या संघटनेकडून सांगण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा