कर्नाटकात हिजाबवरून झालेल्या गोंधळात विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी फडकावला भगवा ध्वज, कलम-144 लागू

कर्नाटक, 9 फेब्रुवारी 2022: हिजाबच्या वादावरुन कर्नाटकातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कर्नाटकात एका शैक्षणिक संस्थेत तिरंग्याऐवजी भगवा ध्वज लावण्यात आलाय. यासंबंधीचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. याप्रकरणी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांचं वक्तव्यही आलं आहे. अशा घटनांचा फटका बसलेल्या शैक्षणिक संस्था आठवडाभर बंद ठेवण्याची सूचना त्यांनी केली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ कर्नाटकातील शिमोगा येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये एका व्यक्तीला ध्वजाच्या खांबावर चाढवलं जात आहे. खाली इतर अनेक लोक उभे आहेत, ज्यांना विद्यार्थी म्हणून सांगण्यात आलं आहे. खांबावर भगवा झेंडा लावल्यानंतर विद्यार्थी जल्लोष करताना दिसत आहेत.

शिमोगा येथे सकाळी दगडफेकीची घटना घडली होती, त्यानंतर तेथे कलम 144 लागू करण्यात आलाय. याशिवाय, जेव्हा जेव्हा त्यांना आपल्या जागी वातावरण बिघडत असल्याचं जाणवेल तेव्हा त्यांनी 2-3 दिवसांची सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना सरकारने महाविद्यालयांना दिल्या आहेत.

कर्नाटक हिजाब रो दरम्यान आणखी काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. कर्नाटकातील एका महाविद्यालयातून आणखी एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये हिजाब घातलेल्या मुलीसमोर काही लोक जय श्री रामच्या घोषणा देत आहेत. आणि मुलगी ‘अल्लाहू अकबर’ म्हणत आहे.

काय आहे हिजाबचा वाद

कर्नाटकात हिजाबबाबत अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गदारोळ सुरू आहे. एकीकडं मुस्लिम मुली शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालून निषेध नोंदवत आहेत, तर दुसरीकडं अनेक विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून निषेध नोंदवत आहेत. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं असून त्यावर आज सुनावणी होणार आहे.
हिजाबच्या वादात नुकतेच कर्नाटक सरकारने कर्नाटक शिक्षण कायदा-1983 चं कलम 133 राज्यात लागू केलं आहे. त्यामुळं आता सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. याअंतर्गत सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निश्चित गणवेश परिधान केला जाईल, खासगी शाळांनाही स्वतःचा गणवेश निवडता येईल.

हा वाद गेल्या महिन्यात जानेवारीत सुरू झाला, जेव्हा उडुपीतील एका सरकारी कॉलेजमध्ये 6 विद्यार्थिनींनी हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई केली होती, परंतु तरीही त्यांनी तो परिधान केला होता, यावरून वाद निर्माण झाला होता. या वादानंतर इतर महाविद्यालयांमध्येही हिजाबबाबत गदारोळ सुरू असून, त्यामुळं अनेक ठिकाणी अभ्यासावर परिणाम होत असून, हा मुद्दा जोर धरू लागला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा