दिल्ली: झी एंटरटेनमेंटमध्ये एस्सेल समूहाचा सध्या (सप्टेंबर २०१९ अखेर) २२.३७ टक्के हिस्सा आहे. पैकी ९० टक्के हिस्सा हा समूहाला अपरिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांकडे गहाण ठेवण्यात आला आहे. समूहावरील ६,००० कोटी रुपयांचा कर्जभार कमी करण्यासाठी एस्सेलने यापूर्वीही एकदा प्रयत्न केला होता. समूहाने सप्टेंबरमध्ये झी एंटरटेनमेंटमधील ११ टक्के हिस्सा ४,२२४ कोटी रुपयांना इन्व्हेस्को-ऑपेनहायमर या मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक कंपनीला विकला होता.
झी एंटरटेनमेंटमधील १६.५ टक्के हिस्सा चीनच्या ओएफआय ग्लोबल या वित्तसंस्थेला विकण्यासंबंधी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. यानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील झी एंटरटेन्मेंट लिमिटेडमध्ये गोयल यांचे भागभांडवल अवघे ५.८७ टक्क्यांपर्यंत संकोचणार आहे. मुख्य प्रवर्तक एस्सेल समूहावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी उद्योजक सुभाष चंद्रा गोयल यांनी झी एंटरटेनमेंटमधील हिस्सा विकण्याच्या निर्णय घेतल्यामुळे परिणामी त्यांचे माध्यम, मनोरंजन व्यवसायावरील मालकी आणि नियंत्रणही गमावले जाणार आहे.