नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर २०२०: शुक्रवारी भारतीय नौदलानं आपल्या सामर्थ्यात एक नवीन महत्त्वाची भर घातली आहे. शुक्रवारी आयएनएस कोरा येथून एंटी-शिप मिसाईल (एएसएचएम) डागण्यात आली. बंगालच्या उपसागरात याची चाचणी घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार आयएनएस कोरा येथून डागण्यात आलेल्या एंटीशीप मिसाईल’नं आपल्या लक्ष्यावर अचूक पणे निशाणा साधला व चाचणीसाठी ज्या जहाजाचा वापर करण्यात आला होता त्या जहाजाला भेदत पूर्ण चक्काचूर करून टाकले.
भारतीय नौदलानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, आयएनएस कोरा येथून डागण्यात आलेल्या मिसाईलच्या रेंजचा पूर्ण क्षमतेचा वापर करण्यात आला. आपल्या पूर्ण क्षमतेवर कार्य करत असताना देखील या मिसाईल’नं निश्चित केलेलं लक्ष अचूकपणे भेदलं आहे.
आयएनएस कोरा एक कोरा-क्लास युद्धनौका आहे, ज्याचा उपयोग अशा क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणासाठी केला जातो. १९९८ साली हे भारतीय नौदलात दाखल झाले. हे जहाज भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट २५ ए अंतर्गत डिझाइन केलेलं होतं. या युद्धनौकामध्ये केएच -३५ अँटी शिप क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आयएनएस किर्च, आयएनएस कुलिश आणि आयएनएस करमुक अशा तीन युद्धनौका देखील भारतीय नौदलाकडं आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे