नवी दिल्ली, ९ ऑक्टोंबर २०२०: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी गुरुवारी सायंकाळी निधन झालं. ते बराच काळ आजारी होते. त्यांचे पुत्र आणि एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विटर हँडलवरून रामविलास पासवान यांच्या निधनाची पुष्टी केली. चिराग पासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, “पापा …. आता आपण या जगात नाही, परंतु मला माहित आहे की तुम्ही जिथे कुठे आहात तिथे नेहमीच माझ्याबरोबर असाल. मिस यू पापा …”
रामविलास पासवान यांना विनोदानं राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सुप्रीमो लालू प्रसाद यादव गमतीनं हवामानशास्त्रज्ञ म्हणत असत. त्याचं कारण म्हणजे रामविलास पासवान हे सदैव सत्तेत होते. त्यांनी सहा पंतप्रधानांसह मंत्रिमंडळात काम केलं. काँग्रेसच्या सत्तेविरोधात आणीबाणीच्या वेळी ते तुरूंगात गेलेले रामविलास पासवान नंतर त्यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये मंत्री होते. त्या काळात भाजपनं त्यांच्या धोरणांना विरोध केला होता परंतु पासवान पुन्हा विद्यमान मोदी सरकारमध्ये मंत्री झाले.
सुरुवातीचा प्रवास कसा होता
विद्यार्थीदशेत राजकारणात सक्रिय होवून राम विलास पासवान जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी चळवळीतून पुढे आले. बिहार विधानसभा निवडणुकीत पासवान पहिल्यांदा युनायटेड सोशलिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९६९ मध्ये जेव्हा लोकदल स्थापन झाला तेव्हा पासवान त्याच्यात सामील झाले आणि त्यांना सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आलं. १९७५ च्या आणीबाणीचा निषेध म्हणून पासवान तुरुंगातही गेले.
पहिल्यांदा खासदार...
रामविलास पासवान यांनी १९७७ मध्ये प्रथमच जनता पक्षाचे उमेदवार म्हणून हाजीपुर जागा जिंकून लोकसभेत प्रवेश केला. हाजीपुरात त्यांनी विक्रमी मताधिक्यानं विजय मिळविला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर १९८० च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्याच जागेवरुन विजय मिळविला.
सहा पंतप्रधानांच्या कारकिर्दीत राहिले मंत्री
रामविलास पासवान यांनी १९८३ मध्ये दलितांच्या उत्थानासाठी दलित सैन्याची स्थापना केली. १९८९ मध्ये ९ व्या लोकसभेत तिसऱ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातील व्ही.पी. सिंग सरकारमध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात स्थान मिळालं आणि कामगार कल्याण मंत्री बनवण्यात आलं. यानंतर एचडी देवगौडा आणि आयके गुजरात सरकारमध्ये पासवान यांना १९९६ ते १९९८ पर्यंत रेल्वेमंत्री करण्यात आलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे