कदमवाकवस्ती, दि. ७ मे २०२०: जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एकावर कोयत्याने वार करत, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील घोरपडे वस्तीमध्ये घडला असून याविषयी समीर अकबर हाश्मी(वय २० वर्षे,रा. कदमवस्ती, ता. हवेली जि. पुणे) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या संदर्भात पोलीसांनी प्रणव शिरसट, अभिजित आहेरकर, रिण्या अन्सारी व इतर ४ ते ५ अनोळखी मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, यातील फिर्यादी रात्री नऊच्या सुमारास उपवासासाठी फळे आणण्यासाठी घोरपडे वस्ती येथे गेला असता, काही दिवसांपूर्वी ऋषिकेश पवार व प्रणव शिरसट यांची भांडणे झाली होती. ऋषिकेश पवार व फिर्यादी मित्र असल्याने शिरसट व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी मोटारसायकलवरून येऊन फिर्यादीला तलवार व कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारले. यावेळी वार अडविताना फिर्यादीच्या उजवा हाताच्या बोटाला व मनगटाला गंभीर दुखापत झालेली असून त्यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणातील पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी-ज्ञानेश्वर शिंदे