बीड, दि.२२ मे २०२० : लॉक डाऊनच्या काळात बँक आणि खासगी सावकारांच्या कर्जाला कंटाळून जिल्ह्यात १३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या १३ शेतकर्यांपैकी ६ शेतकरी हे जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी पात्र ठरवले. मात्र त्यांनाही अद्यापपर्यंत प्रत्यक्षात मदत पोहचली नाही तर इतर सात शेतकरी कशामुळे अपात्र ठरवले याची माहितीही जिल्हा प्रशासन देत नाही.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बँक आणि खासगी सावकार यांच्या कर्जामुळे नैराश्यात येऊन १३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोना रोगाची महामारी असल्यामुळे आपल्यावरील कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेमध्ये हे शेतकरी अडकलेले होते. विमा कंपनीनेही आडमुठे धोरण स्वीकारले असून पीक विमा भरलेल्या शेतकर्यांना अद्याप विमा दिलेला नाही. खरीप हंगामाचे पीक कर्जही बँकांनी सुरू केले नाही.
जे शेतकरी या पीक कर्जासाठी बँकेत जातात त्यांना सतराशे साठ कागद आणि नियम अटींचा भडीमार बँक प्रशासनाकडून केला जातो. सर्वच परिस्थिती नैराश्येची असल्याने जिल्ह्यातील १३ शेतकर्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत गळफास घेऊन आत्महत्या केली तर इतर तीन शेतकर्यांनीही आत्महत्या केल्या. मात्र त्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे नाही. आत्महत्या केलेल्या १३ पैकी ६ शेतकर्यांना पात्र केले , मात्र सात शेतकर्यांना कशामुळे अपात्र ठरवले याबाबत जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरीय समितीचा अहवाल नसल्याचे कारण दिले जाते.
जे सहा शेतकरी पात्र ठरवले त्यांचे कुटुंबही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: