मुंबई, २७ ऑक्टोबर २०२०: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची २६ ऑक्टोबरला घोषणा करण्यात आली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि हिटमॅन असलेला रोहित शर्माला या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. रोहित दुखापतग्रस्त असल्याने त्याची निवड न केल्याचे सांगितले जात आहे. रोहित आणि इशांत शर्माच्या दुखापतीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचे बीसीसीआयने ट्विटद्वारे कळवले आहे. यानंतर मुंबई इंडियन्सच्या ट्विटवरुन रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करत असल्याचे फोटो शेअर करण्यात आले.
या फोटोनंतर क्रिकेट विश्वात अनेक चर्चांना उधाण आलं. जर रोहित नेट्समध्ये सराव करतोय, तर त्याला अशी कोणती दुखापत झालीये, ज्यामुळे तो खेळू शकत नाही, अशा चर्चांना सुरुवात झाली. दरम्यान लिटिल मास्टर सुनील गावसकर रोहितची निवड न केल्याने संतापले आहेत. तसेच रोहितची निवड न झाल्याने चकित आहेत.
रोहित चांगल्या प्रकारे नेट्समध्ये सराव करतोय. रोहितला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असती, तर तो नेट्समध्ये सराव करताना दिसला नसता. रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड का केली नाही, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. रोहितला नक्की काय झालंय, कोणत्या प्रकारची दुखापत झालीये, ज्यामुळे तो खेळू शकत नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर निवड समितीने समर्थकांना द्यायला हवीत”, असं गावसकर म्हणाले. ते स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे