ठाकरेंची साथ सोडण्यासाठी मला १०० कोटींची ऑफर होती, सुनील राऊतांचा शिंदे गट- भाजपवर आरोप

5

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील राऊत यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मला याआधी १०० कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहेच, पण माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला देखील शंभर कोटींची ऑफर आहे, असं सुनील राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी भाजपसमोर जर गुडघे टेकले असते. तर ते साडेचार महिने जेलमध्ये गेले नसते. पण त्यांना ते कधीही मान्य नव्हतं. ते जेलमध्ये असतानाचे साडेचार महिने माझ्या घरच्यांनी कसे काढले हे फक्त आम्हालाच माहिती आहे. सगळं काही सहन केलं परंतु आम्ही पक्ष सोडला नाही, सोडणारही नाही असं सुनील राऊत यांनी सांगितलं. आमचीच माणसं विकत घेऊन जातात. आमच्याच माणसांना आमच्यासमोर उभं करतात. मला एकही रुपयाचा फंड सरकारकडून मिळत नाही. माझ्यावर ३५ कोटींचं कर्ज आहे. ३५ कोटींची काम केली पण सरकार मला पैसे देत नाही, असा आरोप सुनील राऊत यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

पूर्वी ठाकरे गटात असलेले माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सुनील राऊत यांच्याशी आपले पटत नसल्याचे कारण त्यांनी सांगितले. त्याला मुंबईत शिवसैनिकांच्या बैठकीत सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यादरम्यान, त्यांनी केलेल्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सुनील राऊत म्हणाले, १० दिवसांपूर्वी उपेंद्र सावंत मला म्हणाला की, मला सुद्धा ऑफर आहे. निधी करिता १५ कोटी आणि पाच कोटी कॅशची ऑफर आहे. त्यावेळी तो मला म्हणाला मी निष्ठावंत आहे मी घरी बसेल पण मी शिंदे गटात जाणार नाही. नंतर मी त्याला खूप फोन केले. पण त्याने माझे फोन घेतले नाहीत. नंतर त्यानी शिंदे गटात प्रवेश केला. मला सुनील राऊत यांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत. मला शिंदे गटाकडून चांगली ऑफर होती. लोकांच्या सेवेसाठी मी प्रवेश केला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पण, मला काय कमी अडचणी होत्या का? पण मी विचार बदलणार नाही, असे सुनील राऊत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा