चंद्रावर पाण्यानंतर आता ऑक्सिजनचा शोध, चांद्रयान-३ संपूर्ण मानवतेसाठी उपयुक्त ठरणार

पुणे, ३० ऑगस्ट २०२३ : भारताच्या चांद्रयान-३ ला मोठे यश मिळाले असून चंद्रावर गेलेल्या ‘प्रज्ञान रोव्हरने’ मोठा शोध लावला आहे. प्रज्ञानला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन सापडला आहे. इस्रोने सांगितले की प्रज्ञान आता दक्षिण ध्रुवावर हायड्रोजन शोधत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला, जगातील वैज्ञानिक समुदायाने हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. पण आता चांद्रयान-३ चंद्रावर संशोधन करत आहे, जे केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरणार आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञानला ऑक्सिजनसोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अॅल्युमिनियम, कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, सिलिकॉन, टायटॅनियम, सल्फरचे पुरावे मिळाले आहेत. म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनचा पुरावा असल्याचे पहिल्यांदाच जगाला सांगणारा भारत देश बनला आहे.

चंद्रावर पोहोचण्याची भारताची ही तिसरी मोहीम आहे, भारताच्या पहिल्या मिशन चांद्रयान-१ मध्ये चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आढळून आले होते, ही मोहीम २००८ मध्ये पाठवण्यात आली होती. चांद्रयान-२ चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकले नाही, परंतु त्याच्या ऑर्बिटरने बरेच काम केले. आता चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून इतिहास रचला आहे.

चंद्राच्या या भागात हायड्रोजनचा शोध घेणे हे इस्रोचे पुढील अभियान आहे. कारण इथे ऑक्सिजन आधीच उपलब्ध आहे, हायड्रोजनही उपलब्ध झाला तर पाण्याची शक्यता वाढेल. म्हणजेच चंद्रावर ऑक्सिजन आणि पाणी दोन्ही असतील तर मानवी वस्ती उभारण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकते. इस्रोचे महत्त्वाकांक्षी मिशन चांद्रयान-३ २३ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले, ज्याने इतिहास रचला. आता येत्या काळात नवनवीन शोध लावून भारत अंतराळातील प्रमुख शोधकर्ता बनेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा