सुनीताताई गावडे यांना मिळावे जिल्हा परिषद अध्यक्षपद!

शिरूर तालुक्यातून वाढू लागला जोर

विशेष प्रतिनिधी

शिरूर: गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये सक्षमपणे काम करीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिताताई गावडे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याची मागणी शिरुर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.
पुणे जिल्हा परिषदेत सलग ५२ वर्षे गावडे कुटुंबाची सदस्यांना जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी सातत्याने मिळाली आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी टाकळीहाजी गावचे सरपंचपद, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच विधानसभा सदस्य म्हणून गेली पन्नास हून अधिक वर्षे जनसेवेचे काम करीत शिरुर तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे.
पंचायत समीतीचे कार्यक्षमपणे काम करताना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली नाही ही जनतेची खदखद आहे. आता मात्र राष्ट्रवादीचे नेतेमंडळी गावडे कुटुंबाची इच्छा म्हणण्यापेक्षा जनतेची अपेक्षा पुर्ण करीत जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे यांना अध्यक्ष म्हणून संधी देणार काय याकडे शिरुर तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले गेले आहे. गावडे कुटुंबाने राष्ट्रवादी पक्षाशी प्रामाणिक राहुन पद असो वा नसो आजपर्यंत शरद पवार यांच्यावर श्रद्धा ठेउनच काम केले आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्वाला सातत्याने पाठबळ देण्याचे काम केले आहे. विकासाभिमुख तालुका होण्यासाठी गावडे कुटुंबाचे योगदान मोठे आहे. यामध्ये माजी आमदार पोपटराव गावडे हे तीस ते पस्तीस वर्षे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सोनुभाउ गावडे हे जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर सुनिताताई गावडे जिल्हा परिषद सदस्या तसेच जिल्हा परिषदेच्या सभापती, राजेंद्र गावडे हे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच बाजार समितीचे संचालक तसेच मनिषा गावडे या शिरुरच्या नगरसेविका तसेच नगराध्यक्ष म्हणून अतिशय चांगली कारकीर्द अशाप्रकारे गावडे परिवारातील सर्व सदस्यांनी आजपर्यंत जनविकासाचे मोठे योगदान देउन राष्ट्रवादी पक्ष तालुक्यात वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा होण्याची संधी सुनिताताई गावडे यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यांनाच पक्षाने अध्यक्षपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात करीत आहेत.

शिरूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या मातब्बर असलेले गावडे घराणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासाठी आता स्पर्धेत उतरले आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ५२ वर्षे प्रतिनिधीत्व करण्याचा विक्रम करणाऱ्या माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या कुटुंबाची एकच इच्छा शिल्लक आहे ती म्हणजे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद. यावेळी योगायोगाने अध्यक्षपदाचे आरक्षण गावडे यांच्या कुटुंबीयांच्या पथ्यावर पडल्याने शिरुर तालुक्याला दिवंगत माजी खासदार बापूसाहेब थिटे यांच्या अध्यक्षपदानंतर ३८ वर्षांनी पुन्हा एकदा अध्यक्षपद मिळेल का, याची आता उत्सुकता आहे.

तालुक्याच्या राजकारणात एकमेव सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेले कुटुंब म्हणून माजी आमदार पोपटराव गावडे व त्यांचे कुटुंबीय जिल्ह्यात ओळखले जातात. सन १९६७ ला पहिल्यांदा जिल्हा परिषदेत पोहचलेले पोपटराव गावडे तत्पूर्वी सन १९६२ ला शिरुर पंचायत समितीत पोहचले. त्यावेळी पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे सदस्य गणले जात होते.

याच पार्श्वभूमीवर १९७२ ते ७९ शिरुर पंचायत समितीत उपसभापती, सन १९७९ ते ९० सभापती, १९९० ते ९५ जिल्हा परिषद सदस्य होताना १९९५ मध्ये गावडे थेट विधानसभेत पोहचले.
त्यानंतर त्यांचे मोठे सुपुत्र सोनभाऊ गावडे जिल्हा परिषदेत पोहचले. ते सलग दोन टर्म सन २००४ पर्यंत सन २००४ ते २००९ पर्यंत मग मोठ्या सुनबाई सुनिता सोनभाऊ गावडे या जिल्हा परिषदेवर गेल्या आणि तिथे महिला बालकल्याण समितीच्या सभापतीही झाल्या. हे होताना सन २००९ पासून २०१५ या काळात त्या शिरुर पंचायत समितीत पोहचल्या आणि तिथे अडीच वर्षे सभापती कार्यरत राहिल्या. याच काळात त्यांच्या दूसऱ्या सुनबाई मनिषाताई गावडे शिरुर शहरात एक वर्ष नगराध्यक्षही बनल्या होत्या. शिवाय गावडे यांचे दुसरे चिरंजीव राजेंद्र गावडे यांनाही शिरुर बाजार समितीचे संचालकपद आणि घोडगंगाचे संचालकपदापर्यंत पोहचविण्याठी पोपटराव गावडे यांचे मोठे योगदान आहे.
अर्थात हे सर्व होताना जेष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निष्ठेने काम करणारे नेते म्हणून पोपटराव यांनी आपली ‘इमेज’ जपली असताना त्यांच्या कुटुंबाची एकच इच्छा राहिली आहे ती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी विराजमान होण्याची. त्यांच्या सुदैवाने आता अध्यक्षपद खुल्या गटातील महिलेसाठी आले असून सुनिता सोनभाऊ गावडे या जिल्हा परिषदेत विद्यमान सदस्या असल्याने यावेळी गावडे कुटुंबाची आणि त्यांना गेली ५० ते ५५ वर्षे मानणाऱ्या समर्थक कार्यकर्त्यांची राजकीय इच्छा पूर्ण होणार का, याची उत्सूकता आहे. तसे प्रयत्न गावडे कुटुंबीयांकडून असताना शिरुरला दिवंगत माजी खासदार बापूसाहेब थिटे (सन १९८०-८१) यांच्यानंतर ३८ वर्षांनी शिरूरला अध्यक्षपद मिळणार का, याचीही उत्सूकता तालुक्याला आहे हे नक्की.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा