माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाकडुन जामीन मंजूर

नवी दिल्ली, २१ जुलै २०२३ : माजी मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने या कवाईवर ताशेरे ओढले.अनेक वेळा गिरीष चौधरी यांचा जामीनासाठी अर्ज फेटाळला जात होता.भोसरी एमआयडीसी प्रकरणी अखेर सुप्रीम कोर्टाने गिरीष चौधरी यांचा जामीन मंजूर केला आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी हा एक दिलासा असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी या प्रकरणात युती सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना, त्यांना याच कारणावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर या प्रकरणी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील अनेकदा चौकशी करण्यात आली होती.

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना अखेर सु्प्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गिरीष चौधरी हे दीड वर्षापासून तुरुंगात होते, ईडीच्या कारवाईत त्यांना ही शिक्षा झाली होती. पुण्यातील भोसरीमध्ये ३.१ एकर जमीन खरेदीत, एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापूर्वी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात होते. २०१६ मधील हे प्रकरण आहे. ३१ कोटी रुपयांचा ३.१ एकर जमीनाचा हा भूखंड एकनाथ खडसे यांचे जावई आणि खडसे यांच्या पत्नी यांनी ३.७ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

एकनाथ खडसे मंत्री असताना हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा आहे यावर बैठक घेण्यात आली होती. एमआयडीसीसाठी हा भूखंड १९७१ मध्ये अधिग्रहित झाला होता, पण अजूनही अब्बास उकानी यांना भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. कथित आरोपात एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांनी याच दरम्यान अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, बैठकीत त्यांनी हा मुद्दा चर्चेला घेतला. ही बैठक १२ एप्रिल २०१६ रोजी झाली, यात अब्बास उकानी या मूळ मालकाला हा ३.१ एकर जमीनाचा भूखंड परत द्यायचा की, त्यांना अधिक भरपाई द्यायची, याविषयी त्वरीत निर्देश देण्याचे आदेश दिले गेले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा