मुंबई, ११ ऑक्टोबर २०२२: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. अनिल देशमुखांसाठी हा मोठा दिलासा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांना ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात जामीन देण्यास आव्हान देणारी अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला विरोध करत ईडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
१ नोव्हेंबरपर्यंत कोठडी कायम
अनिल देशमुख आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. ईडीच्या प्रकरणात त्यांना ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण, त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केल्याने अद्याप या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नाही. सीबीआयकडून जामीन मिळेपर्यंत म्हणजेच तूर्तास तरी त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच रहावे लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.
