पुणे , १५ जानेवारी २०२३ : पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलन करताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये त्यांना कोणताही इजा झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे हिंजवडी येथे एका कार्यक्रमाला आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये त्यांनी दीप प्रज्वलन केले व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. हे लक्षात येताच सुळे यांनी आग विझवली. यात त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. यानंतर दैनंदिन कार्यक्रम देखील त्यांनी त्याच साडीत सुरु ठेवला.
- सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करताना माझ्या साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली. आमचे हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.