नवी दिल्ली, ५ ऑगस्ट २०२० : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी वातावरण चांगलेच तापले दिसत आहे. महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यामध्ये देखील आता तणाव निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर राजकीय पटलावर देखील हेवेदावे सुरू झाले आहेत. दरम्यान सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी केली. यावेळी कोर्टाने महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना ३ दिवासात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. याशिवाय कोर्टाने महाराष्ट्र सरकारला याप्रकरणाच्या तपासाचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सुशांत मृत्यूप्रकरणी त्याच्या घरच्यांनी रिया चक्रवर्ती विरोधात बिहार मध्ये गुन्हा दाखल केला होता. यावर रिया चक्रवर्ती हिने अशी मागणी केली होती की सदर गुन्हा मुंबईमध्ये दाखल करण्यात यावा. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली आहे. सुनावणी दरम्यान कोर्टाने सर्वांचे म्हणणे जाणून घेतले आणि त्यानुसार कोर्टाने दोन्ही सरकारांना आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पुढील सुनावणी ही आठवड्यानंतर करण्यात येईल.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांना चौकशीपासून रोखणे चांगले संकेत नसल्याचे म्हणत महाराष्ट्र सरकारला सुनावले. कोण कशी चौकशी करत आहे माहीत नाही, पण महाराष्ट्र सरकारने चौकशीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे मत कोर्टाने मांडले.
न्यूज अनकट प्रतिनिधी