मुंबई, ८ जुलै २०२३ : उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटून आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. यादरम्यान ठाकरे यांच्या शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी झालेला नाही. काही दिवसांपूर्वी विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावरून शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे.
पक्षप्रवेशावेळी गोऱ्हे यांनी ठाकरे गट सोडण्यामागे कारणे सांगताना अप्रत्यक्षपणे सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. तर आपण सटरफटर लोकांवर बोलत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावरून सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, मी पक्षात येऊन दहा महिने झाले आहेत. मी आजवर काही चार वेळा, पाच वेळा विधानपरिषद मिळवली नाही. जिल्हाध्यक्ष पद मिळवले नाही, की पक्षातील कुठले मोठे पद मिळवलेले नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी लढणारी मी एक सामान्य शिवसैनिक आहे.
पण त्यांच्या भाषेत मी सटरफटर आहे. असो पण ताई तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही सटरफटर लोकांकडे लक्ष देत नाही, हे चांगले आहे. परंतु तुम्ही हा शब्द वापरून बाळासाहेबांच्या सर्व सामान्य शिवसैनिकांचा अपमान केला आहे. तुम्ही चार वेळा विधानपरिषद मिळवली. परंतु तुम्ही राहता त्या भागात तुम्हाला एक नगरसेवक निवडून आणता आला नाही. की तुमच्या मॉडेल कॉलनीमध्ये शिवसेनेची शाखा नाही असा घणाघात अंधारेनी केला.
तुम्हाला भावी आरोग्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देते असेही त्यांनी म्हटले आहे. तर बुलढाण्यामध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यानंतर गोऱ्हे यांनी कोणत्याही पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली नाही. त्यामुळे त्यांचे मन शिंदे यांच्या शिवसेनेत कधीच गेले होते. आज फक्त प्रवेश झाला. तर मागिल सहा महिन्यांपासून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर आमच्या शिवसैनिकाचे लक्ष होते असही सुषमा अंधारे म्हणाल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर