खासगी विनाअनुदानितवरील शिक्षकांची बदली अनुदानित शाळेवर करण्याच्या निर्णयाला स्थगिती

प्रा. मनोज पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे स्थगिती उठविण्याची मागणी

औरंगाबाद, ४ डिसेंबर २०२२ : खासगी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची बदली अनुदानित शाळा किंवा तुकडीवर करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे विनाअनुदानित शिक्षकांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे.

ही स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील यांनी केली. श्री. पाटील यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव रणजितसिंह देओल यांच्या निदर्शनास आणून दिले, की २८ जून २०१६ व १ एप्रिल २०२१च्या शासन निर्णयानुसार खासगी शाळेतील विनाअनुदानितवरून अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर शिक्षकांची बदली करण्याची तरतूद केली होती. मात्र, शिक्षक भरती बंदीस्त विनाअनुदानितवरून अनुदानितवर बदली केल्याचा ठपका ठेवत शालेय शिक्षण विभागाने १ डिसेंबर २०२२ रोजी एका परिपत्रकाद्वारे या चांगल्या निर्णयाला स्थगिती दिली.

शिक्षक भरती बंदीच्या कालावधीत नव्याने नियुक्ती देऊ नये, असा नियम आहे; परंतु जे शिक्षक पूर्वीच कार्यरत होते त्यांची विनाअनुदानितवरून अनुदानितवर फक्त बदली करण्यात आलेली आहे. नव्याने पदभरती केलेली नाही. त्यामुळे सदर शासन निर्णयाला स्थगिती देणे विनाअनुदानित शिक्षकबांधवांवर अन्यायकारक वाटते. तर या. मंत्रिमहोदयांनी १ डिसेंबर २०२२ चे स्थगिती परिपत्रक मागे घेऊन पूर्वीप्रमाणेच विनाअनुदानितवरून अनुदानित शाळेवर किंवा तुकडीवर जाण्याची संधी विनाअनुदानित शिक्षकांना द्यावी, अशी मागणी प्रा. मनोज पाटील यांनी केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा