स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग १ जानेवारीपासून खुला..!

18

पुणे, २९ डिसेंबर २०२०: स्वारगेट ते कात्रज चौकापर्यंतच्या गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बीआरटी मार्गातील बहुतांशी त्रुटी दूर झाल्या असून उरलेल्या बाबी येत्या तीन दिवसांत पूर्ण करणार आहोत. त्यामुळे स्वारगेट-कात्रज हा बीआरटी मार्ग येत्या १ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

आज स्वारगेट ते कात्रज यादरम्यानच्या बीआरटी मार्गाची पाहणी पुण्याचे महापौर, महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांनी या मार्गाचा ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर आढावा घेतला. कामाच्या पाहणीनंतर बीआरटी सुरु करण्याची घोषणा केली.

पाहणीवेळी उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, काँग्रेसचे गटनेते श्री आबा बागुल, आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, नगरसेवक श्री श्रीनाथ भिमाले, श्री राजेंद्र शिळीकर, श्री प्रवीण चोरबेले, श्री गोपाळ चिंतल, श्री महेश वाबळे, श्री युवराज बेलदरे, नगरसेविका सौ. वर्षाताई तापकीर, सौ. स्मिताताई वसते, सौ. मानसीताई देशपांडे, सौ. मनीषाताई कदम, सौ. राणीताई भोसले, सौ. अमृताताई बाबर, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, वाहतूक उपयुक्त राहुल श्रीरामे, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, विद्युतचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल, परिमंडळ १ च्या वाहतूकच्या वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.

स्वारगेट-कात्रज बीआरटीच्या कामाची निविदा २०१६ साली काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने २०१८ साली नव्याने ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र आचारसंहिता आणि या रस्त्यावररील प्रमुख दोन उड्डाणपुलांची कामे, यामुळे बीआरटीच्या कामाला विलंब झाला. आता यातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून उरलेली काही कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे हा मार्ग खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तांत्रिक प्रक्रिया आणि विविध बाबींमुळे हे काम लांबले असले तरी आता त्यातील त्रुटी दूर केल्या आहेत. काम योग्यरित्या पूर्ण झाले असून १ जानेवारीपासून हा मार्ग खुला करण्यात येत आहे. या मार्गाचा फायदा या भागातील नागरिकांना उत्तमरीत्या होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे.