पुणे जिल्ह्यात “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवले जाणार आहे. या अभियानाचा उद्देश महिलांचे व बालकांचे आरोग्य तपासून कुटुंबाचे आरोग्य सुदृढ करणे हा आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्ह्यातील महिला व बालकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. महिलांच्या तपासणीत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, अॅनिमिया आणि सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती दिली जाईल. तसेच रक्तदान शिबिरे, आयुष्यमान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्ड वितरण आणि निक्षे मित्र स्वयंसेवी नोंदणीसारखे उपक्रमही राबवले जातील.
या शिबिरांसाठी स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि कर्करोग तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ३२४ शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर, ३३२४ शिबिरे उपकेंद्रांवर आणि ८५ शिबिरे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
या अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी बारामती येथील स्त्री रुग्णालयात खासदार सुनीत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर इतर तालुक्यांमध्ये खासदार आणि आमदारांच्या हस्ते उद्घाटन होईल. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक, आशा व स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स, प्रसूती व स्त्रीरोग संस्था तसेच रोटरी क्लब यांचाही सक्रिय सहभाग असेल.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले की, या अभियानामुळे महिलांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल आणि कुटुंबाच्या आरोग्यसुरक्षेत सकारात्मक बदल घडून येईल.










































