चाकूर, लातूर, २० जानेवारी २०२४ : सहाय्यक प्रशिक्षण केंद्र, सिमा सुरक्षा बल चाकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज परेड मैदानावर नवीन प्रशिक्षणार्थी १८१ जवानांचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. या भव्य परेडचे नेतृत्व नूतन जवान पडोळकर राहुल शिवाजी यांनी केले. या जवानांचे प्रशिक्षण १७ एप्रिल २०२३ ते २० जानेवारी २०२४ पर्यंत ३८ आठवड्यांचे होते. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, गुजरात, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, मणिपूर, पंजाब, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीर इत्यादी देशातील विविध राज्यांतील नवीन जवानांचा समावेश आहे.
प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नवीन जवानांना महानिरीक्षक, सुरेश चंद यादव यांच्या हस्ते वेगवेगळे पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये सर्व तासासाठी प्रथम क्रमांक १८१ मधील नवजवान पंकज तिवारी यांना सुवर्णपदक तर सर्व तास सेकंदासाठी कॉन्स्टेबल रोहित रोहिला यांना रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये सैनिकांना शारीरिक कार्यक्षमता, शस्त्रे, दारुगोळा, फील्ड क्राफ्ट, नकाशा वाचन आणि फील्ड इंजिनीअरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या विषयांशिवाय अंतर्गत सुरक्षा कर्तव्य, सीमा व्यवस्थापन, कायदा आणि मानवाधिकार इत्यादी विषयांवरही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
दीक्षांत समारंभानंतर जवानांनी चित्त थरारक प्रात्यक्षिक करून प्रक्षेकांचे मने जिंकली. त्यांनंतर टाळ्यांच्या गजराने प्रेक्षकांनी जवानांचे मनोबल वाढवले. महानिरीक्षक सुरेश चंद यादव उत्तीर्ण झालेल्या जवानांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, बिएसएफ चाकूर येथून हे नवीन जवान प्रशिक्षणानंतर भारताच्या विशाल सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात केले जातील आणि कठीण परिस्थितीतही ते देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहेत. शिवाय त्यांनी जवानांच्या पालकांचे अभिनंदन केले कारण त्यांनी आपल्या शूर पुत्रांना सीमा सुरक्षा दलाच्या माध्यमातून भारत देशाची सेवा करण्यासाठी पाठवले. या कार्यक्रमास चाकूर पोलीस स्टेशनचे आयपीएस अधीकारी बी. चंद्रकांत रेड्डी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, वेगवेगळ्या राज्यातील प्रक्षेक, बिएसएफचे जवान, नवीन प्रशिक्षणार्थी, चाकूर व परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सतिश गाडेकर