टी -20 वर्ल्डकपच्या तारखांची घोषणा, १७ ऑक्टोबरपासून युएई-ओमानमध्ये सामने खेळले जाणार

16

दुबई, ३० जून २०२१: कोरोना साथीच्या आजारामुळं टी -२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान भारताऐवजी युएई आणि ओमान येथे खेळला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) मंगळवारी ही घोषणा केली. यापूर्वी एक दिवस आधी बीसीसीआय’नं टी -20 वर्ल्ड कप भारताबाहेर खेळला जाण्याचे संकेत दिले होते.

आयसीसी’नं म्हटलंय की, ‘बीसीसीआय या स्पर्धेचं यजमान म्हणून आता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदानात १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत खेळला जाईल.’ ओमान आणि युएई येथे खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील.

२०१६ नंतरची आगामी टूर्नामेंट ही पहिली टी २० विश्वचषक असेल. शेवटच्या वेळी वेस्ट इंडीज’नं इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकलं. प्राथमिक फेरीतल्या आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अलार्डिस म्हणाले की, ‘आमची प्राथमिकता आयसीसी टी -२० विश्वचषक सुरक्षितपणे आयोजित करणे आहे आणि तेदेखील सध्याच्या वेळापत्रकातच. आम्ही अशा देशात या स्पर्धा घेणार आहोत ज्यात जैव-सुरक्षित वातावरणात यापूर्वीही प्रमुख स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, “भारतात स्पर्धेचे आयोजन करण्यास आम्हाला आनंद झाला असता, परंतु सद्य परिस्थितीत आणि जागतिक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन बीसीसीआय युएई आणि ओमान येथे होस्ट करेल.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे