पुणे, ५ नोव्हेंबर २०२३ : विश्वचषक २०२३ मधील ३७ वा सामना आज रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे दुपारी २ वाजता खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता नाणेफेक होईल. या दोघांचा स्पर्धेतील हा आठवा सामना आहे. सलग सात विजय नोंदवून भारताने उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे.
रोहित शर्माची नजर आता आठव्या विजयावर असेल. भारताने शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर ३०२ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. भारत १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर स्टार फलंदाज विराट कोहलीचा आज ३५ वा वाढदिवस असून तो संस्मरणीय करण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत सहा सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडकडून एकमेव पराभव पत्करावा लागला असून दक्षिण आफ्रिका १२ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
१९९२ च्या विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले होते, तेव्हा भारताचा पराभव झाला होता. तेव्हापासून २०११ पर्यंत विश्वचषकात दोघेही तीनदा आमनेसामने आले, तिन्ही सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले. त्यानंतर २०१५ आणि २०१९ मध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडिया जिंकली. वनडे मध्ये दोन संघांमध्ये ९० सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने ३७ आणि दक्षिण आफ्रिकेने ५० जिंकले. तसेच ३ सामन्यांचा निकाल लागला नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या दोघांची भारतात शेवटची टक्कर झाली होती. भारताने ती ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड