मुंबई, १३ मार्च २०२३ : नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘एच३, एन२’फ्ल्यूसंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘एच३, एन२’ फ्ल्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे. या आजाराने महाराष्ट्र बाधित होऊ नये, यासाठी सरकारने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
‘एच३, एन२’फ्ल्यूच्या प्रकारातील शीतज्वराची महाराष्ट्रासह देशात लाट आलेली आहे. वातावरणातील बदल, धुळीचे प्रमाण यामुळे ही साथ वाढली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सर्दी, तीव्र खोकला, ताप, अंगदुखी याशिवाय मळमळ, उलट्या आणि अतिसार अशी लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. कर्नाटक व हरियाणामध्ये या फ्ल्यूने दोन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षावरील वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला याशिवाय हृदयरोग, मधुमेह व दम्याच्या रुग्णांना याची लवकर लागण होत आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आवाहन केलेले आहे. राज्यातही ‘एच३, एन२’चे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. कोविड-१९ रोगाचा अनुभव विचारात घेता झपाट्याने वाढलेली रुग्णसंख्या याचा विचार करता राज्य शासनाने ‘एच३, एन२’बाबतही योग्य उपाययोजना करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर