लॉकडाऊनचा फायदा घेत त्यांनी छापल्या लाखोंच्या बनावट नोटा

हिंगोली, दि. ३ सप्टेंबर २०२०: लॉकडाऊमुळे अनेकांचं कंबरडं मोडलं, सध्याच्या आर्थिक तंगीच्या काळात दोन हजारांची नोट बघणंही अनेकांच्या नशिबात नाही. मात्र हिंगोली जिल्ह्यातल्या दोघांनी चक्क नोटांचा कारखानाच सुरु केल्याचं निदर्शनास आलंय. १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या प्रत्यक्ष व्यवहारातही आणल्या जात होत्या.

हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आनंद नगर येथे ह्या बनावट नोटांची छपाई सुरु होती. आरोपी संतोष सूर्यवंशी आणि त्याची महिला साथीदार छायाबाई भुक्तार या दोघांनाही हिंगोली ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या दोन्ही आरोपींनी आनंद नगर भागात भाडयाने घर घेतलं होतं. त्या घरातच नकली नोटा बनवण्याचं काम सुरु होतं. मुख्य म्हणजे या नकली नोटा त्यांनी चलनात देखील आणल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून २ सप्टेंबरला या दोघांना अटक केली. या दोघांकडून नकली नोटा बनवण्याचे साहित्य, प्रिंटर, १७ लाख ३७ हजार ३५० रुपये रोख रक्कम, पिवळसर धातूच्या महालक्ष्मी देवीच्या १३ मुर्त्या आणि एक चारचाकी असा सुमारे २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

या प्रकरणी दोन्ही आरोपींवर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४८९,(अ),(ब),(क),(ड),(ई) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक शोध घेत आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात या दोन्ही आरोपींनी पैसे मिळवण्यासाठी लढवलेली शक्कल चर्चेचा विषय बनला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा