तळेगाव दाभाडे, १३ एप्रिल २०२३ : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ८५ टक्के करांची वसुली करुन जिल्ह्यात करवसुलीमध्ये उच्चांक मिळविला असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये जवळपास एकूण ३८.००० मिळकतधारक आहेत. यापैकी जवळपास ३२.३५० मिळकतधारकांनी आपल्या मिळकतीचा कर भरणा करून नगर परिषदेच्या उत्पन्नामध्ये भर टाकली आहे.
नगर परिषदेकडे ३१ मार्च अखेर एकूण २० कोटी ६० लाख रुपये मिळकत करापोटी जमा होऊन यावर्षी एकूण शासकीय-निमशासकीय व न्यायालयीन प्रकरणातील रक्कम वसुली खाती जमा दाखवताना ८५% वसुली करत तळेगाव दाभाडे नगर परिषदेने वसुलीचा उच्चांक गाठला असल्याची माहिती कर निरीक्षक विजय शहाणे यांनी दिली. शेवटच्या सत्रात मार्च महिन्यामध्ये थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली होती.
या सर्व मोहिमेचा परिणाम म्हणूनच मागील आर्थिक वर्षांपेक्षा या वर्षामध्ये वसुलीचे प्रमाण अधिक राहिले असून, पुणे जिल्ह्यातील एकूण १७ नगरपालिका, नगरपंचायती यांच्या तुलनेत वसुलीबाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा अव्वल क्रमांक लागला आहे, असे मुख्याधिकारी सरनाईक यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर