हेरात, १० जुलै २०२१: अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तान मधून काढता पाय घेतल्यानंतर आता तालिबान्यांचा अफगाणिस्तानावरील ताबा वाढत चाललाय. बऱ्याच भागात अफगाण सुरक्षा दलाचे जवान तालिबान्यांच्या भीतीनं शेजारच्या देशांकडं पळून जात आहेत. ताजिकिस्ताननंतर अफगाण सुरक्षा दलाचे जवान इराणला जाण्यासाठी सीमा ओलांडत आहेत.
न्यूयॉर्क टाईम्स साठी इराणमधून रिपोर्ट करत असलेल्या पत्रकार फरनाज फास्सिह यांनी ट्विट केलंय की, “इराणच्या सीमेजवळील कस्टम पोस्ट तालिबानच्या ताब्यात आहे आणि अफगाण सैनिक इराणमध्ये पळ काढत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट इराण सरकारच्या अधिकृत मिडीया अहवालात हे सांगितलं जात आहे. इराण जेव्हा तालिबान आणि सरकारच्या प्रतिनिधींसह अफगाणिस्तान शांतता चर्चेचे आयोजन करीत आहे तेव्हा असौ होताना दिसत आहे.
गुरुवारी तालिबान्यांनी इराण सीमेस लागून असलेली आणखीन एक महत्वाची अफगाण सीमाही ताब्यात घेतली. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघार घेतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानात वेगानं नियंत्रण मिळवलंय. अफगाणिस्तानाबरोबरची ही तिसरी सीमा असून ती तालिबाननं ताब्यात घेतली आहे. यापूर्वी तालिबाननं ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या अफगाणिस्तानच्या सीमेवर ताबा मिळविलाय. तालिबानींचे वर्चस्व लक्षात घेता ताजिकिस्ताननं आपल्या सीमेवर सैन्य दलांची तैनाती वाढविलीय, तर अनेक देशांनी या भागात स्थित त्यांचे वाणिज्य दूतावास बंद केले आहेत.
अफगाण अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगितलं की, गुरुवारी पश्चिम हेरात प्रांतात तालिबान्यांनी इस्लाम कला क्रॉसिंग पॉईंट ताब्यात घेतला. इराणी मीडियाच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तान आणि इराण दरम्यान क्रॉसिंग म्हणून वापरल्या जाणार्या पॉईंट इस्लाम कला या सीमावर्ती भागात तैनात अफगाण सैनिक आपले पोस्ट सोडून इराणला आश्रय घेण्यासाठी पळून गेले. हा क्रॉसिंग पॉईंट प्रांतीय राजधानी हेरात शहराच्या पश्चिमेला १२० किलोमीटर अंतरावर आहे.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी इस्लाम कला ताब्यात घेणे बाबत पुष्टी केली. त्यांनी ट्वीट केलं की, तालिबानी सैनिक इस्लाम कला शहरात घुसले आणि स्थानिकांनी त्यांचं स्वागत केलं. इस्लामिक कला भागात ट्रकमध्ये तालिबान सैनिक जल्लोष करताना हवेत गोळीबार करत असल्याचा एक व्हिडिओही मुजाहिदनं पोस्ट केला होता.
पूर्वी बर्याच ठिकाणी अफगाण सैनिकांनी तालिबानसमोर शस्त्रे ठेवल्याची बातमी होती. डेली मेलच्या वृत्तानुसार, असे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत ज्यात अफगाण सैनिक तालिबानी लढाऊ सैनिकांसमोर आत्मसमर्पण करीत आहेत. तालिबान असे व्हिडिओ प्रचारासाठी वापरत आहेत. तालिबानचा संदेश स्पष्ट आहे की, जर अफगाण सैनिक शरण गेले तर ते त्यांच्यावर हिंसाचार करणार नाहीत.
रविवारी तालिबानशी झालेल्या चकमकीनंतर अफगाणिस्तानच्या नॅशनल आर्मीच्या हजाराहून अधिक सैनिकांनी अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बख्खन प्रांतात ताजिकिस्तानला पलायन केलं. अफगाण सैनिकांच्या पलायाना नंतर तालिबान्यांनी अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत.
यावर अफगाणिस्तानात अमेरिकन व नाटो सैन्याच्या कमांडर जनरल ऑस्टिन स्कॉट मिलर यांनी सांगितलं की, अफगाण नॅशनल आर्मीच्या सैनिकांनी किती लवकर तालिबानच्या स्वाधीन केलं याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं. अमेरिका आणि नाटोच्या माघारानंतर गेल्या काही महिन्यांत अफगाणिस्तानात तालिबानांचं वर्चस्व वाढलं आहे. मंगळवारी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं सांगितलं की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य आणि सैन्य उपकरणं काढणं ९०% पूर्ण झालं आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की ऑगस्टपर्यंत उर्वरित सैनिकही परत येतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे