काबूलमधील शाळेत बॉम्बस्फोट, तालिबानचा नेता शेख रहिमुल्ला हक्कानी ठार

काबूल, १२ ऑगस्ट २०२२: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तालिबानचा नेता शेख रहीमुल्लाह हक्कानी मारला गेला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हक्कानीशी संलग्न असलेल्या शाळेत गुरुवारी हा बॉम्बस्फोट झाला, जिथे त्याचा मृत्यू झाला. गेल्या १५ दिवसांत राजधानी काबूल बॉम्बस्फोटाने हादरण्याची ही दुसरी वेळ आहे.

काबूलमधील गुप्तचर विभागाचे प्रमुख अब्दुल रहमान यांनी बॉम्बस्फोटाला दुजोरा दिलाय. त्याचवेळी इस्लामिक अमिरातीचे उपप्रवक्ते बिलाल करीमी यांनी शेख रहीमुल्लाह हक्कानी याच्या मृत्यूला दुजोरा दिलाय.

तालिबानशी संबंधित ४ सूत्रांचा हवाला देत रॉयटर्सने सांगितलं की, हा हल्ला एका धार्मिक शाळेत (मदरसा) झाला. यापूर्वी एक पाय गमावलेल्या व्यक्तीने प्लास्टिकच्या पायात स्फोटक लपवलं होतं. त्यानंतर डिटोनेटरच्या साहाय्याने हा बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटामागं कोणाचा हात आहे आणि त्याचा हेतू काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याचा तपास तालिबानकडून सुरू आहे.

याआधी ६ ऑगस्ट रोजी काबूलमधील निवासी भागात दोन बॉम्बस्फोट झाले होते. काबुलच्या पश्चिम भागात हे स्फोट झाले. यातील एक स्फोट येथील हजारा मशिदीत झाला. या स्फोटांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला होता. इस्लामिक स्टेटने (आयएस) या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. महिलांना लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला. या घटनेत बळी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

या स्फोटात हजारा आणि शिया लोकांना लक्ष्य करण्यात आलं. काबुलमधील सार-ए-करीझ भागात असलेल्या इमाम मोहम्मद बेकर या मशिदीमध्ये स्फोट झाला. काबूलमधील ज्या भागात स्फोट झाला तो रहिवासी परिसर आहे. येथील मुख्य लोकसंख्या शिया मुस्लिमांची आहे.

या स्फोटात आठ जण ठार झाले, तर १८ जण जखमी झाल्याचं अफगाणिस्तान पोलिसांनी सांगितलं. तर इस्लामिक स्टेटने आपल्या वक्तव्यात २० जण ठार आणि जखमी झाल्याचे म्हटले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा