काबूल, १८ ऑगस्ट २०२१: अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. अँटनी ब्लिंकेन यांनी अफगाणिस्तानमध्ये थेट हितसंबंध असलेल्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना बोलावले. ब्रिटन, रशिया, चीनसह भारताचाही समावेश अफगाणिस्तानच्या विकासावर मोठ्या प्रमाणावर खर्च करणाऱ्या देशांमध्ये आहे आणि अनेक प्रकल्प अजून पूर्ण होणे बाकी आहे. दरम्यान, अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानने म्हटले आहे की, भारताने अफगाणिस्तानमधील आपले प्रकल्प पूर्ण करावे. एका अंदाजानुसार, भारताने अफगाणिस्तानमधील विकास प्रकल्पांमध्ये तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
पाकिस्तानी वाहिनी ‘हम न्यूज’ शी बोलताना तालिबानच्या नेत्याने अफगाणिस्तानची जमीन इतर देशांविरुद्ध न वापरण्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की, भारताने आपले प्रकल्प पूर्ण करावे. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की, कोणत्याही देशाला अफगाणिस्तानची भूमी इतरांच्या विरोधात वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. भारत अफगाणिस्तानमधील आपले अपूर्ण पुनर्निर्माण आणि पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करू शकतो.
पाकिस्तानी न्यूज अँकरने तालिबानच्या प्रवक्त्याला विचारले, भारताने अफगाणिस्तानात खूप गुंतवणूक केली आहे, पण भारताने तालिबानला कधीच मान्यता दिली नाही, पण परिस्थिती बदलली आहे का? यावर सुहेल शाहीन म्हणाले, ‘प्रथम आम्ही म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही देशाला, कोणत्याही गटाला अफगाणिस्तानचा भूभाग कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देणार नाही. हे स्पष्ट आहे. दुसरे, जर त्यांनी (भारताने) तेथे (अफगाणिस्तानात) पायाभूत सुविधा प्रकल्प बांधले आहेत, पुनर्बांधणी करत आहेत आणि ते पूर्ण झाले नाहीत, तर त्यांनी ते पूर्ण करावे कारण ते लोकांसाठी आहे.
तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले, “पण जर कोणी अफगाणिस्तानचा भूभाग स्वतःच्या हेतूसाठी, आपल्या देशाच्या हेतूसाठी, त्याच्या भांडणासाठी वापरला तर आम्ही त्याला परवानगी देणार नाही.”
पाकिस्तानी न्यूज अँकरने पुन्हा तालिबानच्या प्रवक्त्याला विचारले की, भारताच्या अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या विरोधात काम करणारे अनेक वाणिज्य दूतावास आहेत आणि तुम्ही म्हणताय की अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध वापरू दिली जाणार नाही, म्हणून आता तुम्हाला भारताशी चांगले संबंध हवे आहेत का?
आपल्या मुद्द्याचा पुनरुच्चार करताना सुहेल शाहीन म्हणाले, ‘जर भारताचे अफगाणिस्तानमध्ये धरण आणि रस्त्या सारखे प्रकल्प आहेत आणि ते अद्याप पूर्ण झाले नाहीत, तर भारताने येऊन ते पूर्ण करावे. पण दुसरे, आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की जर कोणत्याही देशाने अफगाणिस्तानचा वापर दुसऱ्या देशाविरुद्ध केला तर आम्ही त्याला परवानगी देणार नाही. हे आमचे स्पष्ट धोरण आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत तालिबानच्या प्रवक्त्याने असेही म्हटले होते की, तालिबान भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वाचा भाग होऊ इच्छित नाही. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले होते, ‘मी गेल्या ४० वर्षांपासून येथे जिहाद करत आहे. आम्हाला तुमच्या (भारत) आणि पाकिस्तानमधील लढाईचा भाग व्हायचे नाही. आम्ही स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक आहोत; आम्ही अफगाणिस्तानचे लोक आहोत.
मात्र, या दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सोमवारी त्यांच्या अमेरिकन समकक्ष अँटोनी ब्लिंकेन यांच्याशी बोलल्यानंतर ट्विट केले. जयशंकर यांनी लिहिले, ‘अफगाणिस्तानमधील ताज्या घडामोडींवर चर्चा करताना त्यांनी काबूलमधील विमानतळाचे कामकाज पूर्ववत करण्याची गरज अधोरेखित केली. या संदर्भात चालू असलेल्या अमेरिकेच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहे.’
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी केलेल्या फोनवरील संभाषणाबद्दल सांगितले की, त्यांनी फक्त अफगाणिस्तान आणि तेथील परिस्थितीवर चर्चा केली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी झालेल्या संभाषणात ब्लिन्केन यांनी सुरक्षा परिस्थिती आणि स्थलांतर यावर चर्चा केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे