पुरंदर, ता. १२: तामिळनाडू येथे छत्रपती व्यंकोजी राजे यांचे वंशज दुसरे सरफिरोजी राजे यांच्या नावाने सप्टेंबर महिन्यात तंजावर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करणार असल्याची घोषणा तामिळनाडू-तंजावर येथील व्यंकोजी राजे यांचे १३ वे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांनी सासवड येथे केली.
सासवड ( ता. पुरंदर ) येथील होनाजी बाळा साहित्य नगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्गुरु तुकाराम महाराज साहित्य परिषद यांच्या वतीने संभाजी महाराज ११ वे साहित्य संमेलन आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड येथे संपन्न झाले. छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले व येसूबाई स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेची अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाची सुरुवात झाली.
यावेळी संभाजीराजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर हे होते. तर स्वागताध्यक्ष सासवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव कोलते, निमंत्रक द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आत्माराम कामथे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, हरिभाऊ लोंळे, प्रशांत वांडेकर, विठ्ठलअप्पा झेंडे, ह.भ.प किसन महाराज चव्हाण, बाळासाहेब झेंडे, सुजाता गुरव आदी उपस्थित होते.
आज पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तथाकथित इतिहासकारांनी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला होता. पण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्याचे कार्य अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे परिषद पुणे ही संस्था करीत आहे. त्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक संघटनेचे संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी केले.
साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठीचा जागर होत आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार जनतेपर्यंत पृथ्वी देण्याचे काम या माध्यमातून होत असल्याचे ॲड. शिवाजी कोलते यांनी सांगितले. महाराष्ट्रात अनेक साहित्य संमेलने होतात. पण पुरंदर येथील संभाजी महाराज व महात्मा फुले यांचे साहित्य संमेल हे क्रांतिकारी संमेलन ठरले असल्याचे प्रास्ताविकात दशरथ यादव यांनी सांगितले.
शहाजीराजे व जिजाऊ माता यांना सहा भाषा येत होत्या. तर छत्रपती संभाजी महाराज यांना १८ भाषा येत होत्या. प्रत्येक भाषेत ते पारंगत असल्यामुळे त्यांचा लोकसंपर्क सहज होत असे. संभाजी महाराज यांनी १२० लढाया केल्या आणि त्या जिंकल्या. लढाईत व भाषा शास्त्रातही ते अजिंक्य असल्याचे प्रतिपादन शरद गोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप, राज्य कार्याध्यक्ष गंगाराम जाधव, सरचिटणीस सुनील लोणकर, प्रसिद्ध प्रमुख दत्ता भोंगळे, तालुकाध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, नंदकुमार दिवसे, दत्ता कड, संजय सोनवणे, रवींद्र फुले, अमोल बनकर, सुनिता कसबे, छाया नानगुडे आदींनी केले. दशरथ यादव, गंगाराम जाधव यांनी सुत्रसंचालन केले. आभार श्यामकुमार मेमाणे यांनी मानले.