पुणे, ११ डिसेंबर २०२२ : संगमनेर तालुक्यातील पानोडी– शिबलापूर रस्त्यावर तऊंग येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरसाची अडीचवर्षीय मादी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत तरसाची संगमनेर येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली.
संगमनेर तालुक्यात पूर्व भागात एका महिन्यात ही दुसरी घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
तरसांची संख्या कमी होत आहे. तरस रात्री खाद्याच्या शोधात बाहेर पडतो. मृत जनावरे खात असल्याने तो स्वच्छतादूत म्हणूनही ओळखला जातो. सध्या ऊसतोड सुरू असल्याने कौठे–मलकापूर येथील श्रीगजानन साखर कारखान्यामुळे पानोडी–शिबलापूर–आश्वी या परिसरात वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने प्राण्यांचे अपघात होत आहेत. तरसांची संख्या कमी होत असल्याने प्राणीमित्रांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शनिवारी पहाटे पाच ते सकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत या तरसाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वन अधिकारी हरिश्चंद्र जोजर व वनरक्षक देवीदास चौधरी तरसास उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरला हलविले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील