नवी दिल्ली, २५ जून २०२१: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारत ११ व्या क्रमांकावर असेल, पण जगातील सर्वाधिक देणगीदारांच्या यादीत तो अव्वल आहे. हुरुन रिसर्च आणि एडेलगिव फाउंडेशनने २३ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे उघड झाले आहे. गेल्या १०० वर्षात जगातील सर्वात मोठ्या देणगीदारांच्या यादीत टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
जमशेदजी टाटांनी १०२.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ७.६० लाख कोटी रुपयांची देणगी देऊन गेल्या १०० वर्षात सर्वात मोठे देणगीदार म्हणून नोंद झाली आहे. ही रक्कम रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा ८४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे .६.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
टाटा सन्स ची ६६% रक्कम केली दान
हुरुन रिसर्च एडेलगिव फाऊंडेशनच्या अहवालानुसार, जमशेदजी टाटांच्या नावावर देण्यात आलेल्या देणग्या टाटा सन्सच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या मूल्यांपैकी ६६% आहेत. टाटा यांनी १८७० च्या दशकात सेंट्रल इंडिया स्पिनिंग विव्हिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली. त्यानंतर १८९२ मध्ये उच्च शिक्षणासाठी जे.एन. टाटा एन्डोमेंटची स्थापना केली गेली, ती टाटा ट्रस्टची सुरुवात होती. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जमशेदजी टाटा यांना ‘वन मॅन प्लानिंग कमिशन’ म्हणून नेहमीच संबोधत असत.
रतन टाटा यांनी त्यांचा वारसा पुढे चालविला
जमशेदजीनंतर त्यांचा वारसा सांभाळणारे रतन टाटादेखील देणगीच्या बाबतीत मागे नाहीत. गेल्या वर्षी मार्चमध्ये टाटा समूहाने कोरोनाशी लढण्यासाठी १५०० कोटी रुपयांची देणगी दिली होती, ही भारतीय व्यापारी संस्थांनी केलेली सर्वात मोठी देणगी होती. हरुण इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनस रेहमान जुनैद म्हणाले की, “जमशेदजी टाटा यांना जगातील सर्वात मोठे परोपकारी म्हणून नाव देण्यात आले ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.”
विप्रोच्या कमाईपैकी ६७% दान करतात अझीम प्रेमजी
टॉप -५० देणगीदारांच्या यादीत अझीम प्रेमजी हे दुसरे भारतीय आहेत. २०१० मध्ये त्यांनी गीव्हिंग प्लेजवर स्वाक्षरी केली. तेव्हापासून ते विप्रोच्या कमाईतील ६७% अजीम प्रेमजी फाउंडेशनकडे हस्तांतरित करतात. हे फाउंडेशन ग्रामीण भागातील शालेय शिक्षणावर काम करते, ज्याचे मूल्य दीड लाख कोटी आहे. अजीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विप्रो यांनी कोविड -१९ वर मात करण्यासाठी १ हजार कोटी रुपये दिले आहेत.
जगातील अव्वल -५० देणगीदार एकत्रितपणे वार्षिक २.२ लाख कोटी रुपये देणगी देतात. मॅकेंझी स्कॉट दरवर्षी ६३ हजार कोटी सर्वाधिक दान देतात. कोविड -१९ साठी देणगी देण्यासाठी फोर्ड फाऊंडेशन ७.४ हजार कोटी सह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर डब्ल्यू.के. केलॉग फाऊंडेशन, ए डब्ल्यू मेलॉन फाउंडेशन यांचा क्रमांक येतो. टाटा यांनी कोरोनासाठी १५०० कोटी रुपये दिले आहेत.
अझीम प्रेमजी सध्या देशातील सर्वात मोठे देणगीदार
हुरुन अँड एडेलगिव फाउंडेशनने २०२० मध्ये भारताच्या देणगीदारांची यादी जाहीर केली. या अहवालानुसार, देणगीदारांच्या यादीत विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी पहिल्या क्रमांकावर आहेत. २०२० या आर्थिक वर्षात त्यांनी सुमारे ७,९०४ कोटी रुपयांची देणगी दिली. म्हणजेच त्यांनी दररोज २२ कोटी रुपये दान केले.
फीलेंथ्रॉपी यादीत प्रेमजीनंतर एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नादर हे आहेत. एका वर्षात त्यांनी ७९५ कोटींची देणगी दिली. त्याचवेळी, आशियाचे सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी ४५८ कोटी रुपयांच्या देणगीसह तिसर्या क्रमांकावर होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे