पुणे, ४ मार्च २०२३: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्ससाठी आजचा दिवस दुहेरी आनंदाचा आहे. एकीकडं टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचा आज १८३ वा वाढदिवस आहे आणि दुसरीकडं टाटा मोटर्सने आज ५० लाखाव्या प्रवासी कारचं उत्पादन केल्याची घोषणा केलीय. टाटा मोटर्सने आज ५० लाख प्रवासी वाहनांच्या उत्पादनाचा टप्पा गाठल्याची घोषणा केली.
कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, हे यश कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं मोठ्या थाटामाटात साजरं केलं. जिथं टाटा मोटर्सच्या कर्मचार्यांनी कंपनीच्या नवीन फॉरेव्हर श्रेणीतील कार आणि SUV च्या साह्याने जमिनीवर ‘५० लाख’ लिहिले. या ऐतिहासिक यशावर भाष्य करताना, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, “आजचा दिवस टाटा मोटर्सच्या इतिहासातील एक आनंदाचा क्षण आहे कारण आम्ही आमचे ५ मिलियन उत्पादन साजरे करत आहोत हा एक मैलाचा दगड आहे.
प्रत्येक मिलियन ते पुढचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. आम्ही प्रत्येक नवीन उत्पादनाने भारत बदलत आहोत. या यशासाठी आम्ही आमचे कर्मचारी, पुरवठादार, चॅनल भागीदार, ग्राहक आणि सरकार यांचे आभार मानतो.
५ मिलियन मैलाचा दगड साजरा करण्यासाठी, टाटा मोटर्स भारतातील ग्राहक आणि कर्मचार्यांसाठी एक उत्सव मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम महिनाभर चालणार असल्याचं कंपनीने म्हटलंय. या यशाच्या निमित्ताने कंपनी आगामी काळात काही सवलतीच्या ऑफर्सही सादर करू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
कसा होता ५० लाख युनिटचा प्रवास?
टाटा मोटर्सने १९७७ मध्ये पुणे प्लांटमधून पहिलं व्यावसायिक वाहन (Comercial Vehicle) आणलं, तर पहिलं प्रवासी वाहन १९९८ मध्ये टाटा इंडिका म्हणून आणलं गेलं. Tata Indica ने भारतात लॉन्च होताच ग्राहकांमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळवली, या कारने एक उत्तम प्रवासी वाहन उत्पादक म्हणून कंपनीची स्थापना केली, जी आज जवळपास २५ वर्षांनंतरही सुरू आहे. आत्तापर्यंत कंपनीने एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक मॉडेल बाजारात आणले आहेत, ज्यात टाटा सफारी, टाटा सुमो, टाटा इंडिगो, टाटा हॅरियर, टाटा पंच, टाटा नेक्सॉन इ.
कंपनीचा २५ वर्षांचा प्रवास पाहिला तर २००४ मध्ये टाटा मोटर्सने १० लाख प्रवासी वाहन उत्पादनाचा आकडा पार केला होता. त्यानंतर २०१० मध्ये २० लाख आणि २०१५ मध्ये ३ मिलियन म्हणजेच ३० लाखांचा आकडा पार केला. २०२० मध्ये जेव्हा कोरोना महामारीने जगभरात दहशत निर्माण केली होती, त्याच वर्षी कंपनीने आपली ४ मिलियनवी म्हणजेच ४० लाखावी कार लॉन्च केली होती.
कोविड-१९ चे संकट आणि सेमीकंडक्टरचा तुटवडा हे दुहेरी संकट जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगाला त्रासदायक असतानाही टाटा मोटर्सने तीन वर्षांत ४ मिलियन कार वरून ५ मिलियन कारचा टप्पा ओलांडलाय. १९९८ पासून ५ मिलियन प्रवासी वाहनांच्या निर्मितीचा हा आकडा पार करण्यासाठी टाटा मोटर्सला २५ वर्षे लागली. गेल्या काही वर्षांत, टाटा मोटर्सने त्यांच्या वाहनांची सेफ्टी, फीचर्स, लुक आणि डिझाइनवर बरंच काम केलंय, ज्यामुळं प्रवासी विभागात कंपनीचा वाटा झपाट्याने वाढला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे