बीड, दि.३० मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद शिक्षकांना डिलिव्हरी बॉयचे काम लावल्याने शिक्षक संतापले आहे. हे काम तात्काळ रद्द करावे, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यात वाढते कोरोना रुग्ण आणि शहरात लावण्यात आलेली संचारबंदी यामुळे शहरवासीयांना किराणा सामान घरपोच देण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी रात्रीतून एक आदेश काढला आहे. यामध्ये शहरातील ३१४ दुकानांवर ६०० पेक्षा अधिक शिक्षक हे डिलिव्हरी बॉय म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
यातील बहुतांश शिक्षकांना तर या आदेशाची दुपारपर्यंत माहिती सुद्धा नव्हती. माहिती मिळाल्यानंतर या शिक्षकांनी प्रशासन आम्हाला वेठबिगार समजते काय ? ,आम्ही ज्ञानदान द्यायचे की किराणा सामानाच्या पिशव्या पोहचविण्याचे काम करायचे असा सवाल केला आहे. अगोदर शिक्षकांना आरोग्य कर्मचारी,नंतर पोलीस,नंतर महसूल विभागासोबत काम करायला लावले ,ही सर्व कामे शासकीय आहेत. मात्र आता खाजगी किराणा दुकानात किराणा पोहच करणे म्हणजे वेठबिगारी आहे असे सांगत शिक्षकांनी हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. या मागणीकडे धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी शिक्षकांतून करण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: