मुंबई, ९ सप्टेंबर २०२१: युएईमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंतिम १५ खेळाडूंची नाव जाहीर केली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. कोहलीकडे कर्णधार पदाची धुरा सोपवत काही नवख्या खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या संघाचा मेन्टॉर असणार आहे.
उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, इशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी २० विश्वचषक संघाचा मार्गदर्शक असणार आहे, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे.
ही स्पर्धा भारता ऐवजी युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. वर्ल्डकपसाठी करण्यात आलेल्या ग्रुप बी मध्ये भारताचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीतील दोन संघ असतील.ग्रुप बी मधील पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीने होईल. ही लढत दुबईत होणार आहे.
टी-२० वर्ल्डकपमधील भारताच्या लढती
२४ ऑक्टोबर- पाकिस्तानविरुद्ध
३१ ऑक्टोबर- न्यूझीलंडविरुद्ध
०३ नोव्हेंबर- अफगाणिस्तानविरुद्ध
०५ नोव्हेंबर- पात्रता संघाविरुद्ध
०६ नोव्हेंबर- पात्रता संघाविरुद्ध
या ठिकाणी रंगणार विश्वचषकाचे सामने
आधी भारतात पार पडणारा टी-२० विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे