टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करून गाठली उपांत्य फेरी, तांबेने षटकार ठोकत जिंकवला सामना

अँटिग्वा; 30 जानेवारी 2022: टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला. शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांगला टायगर्सला मोठं लक्ष्य गाठू न देणाऱ्या भारतीय संघाच्या विजयात त्याच्या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बुधवारी उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अँटिग्वा येथील कुलीज क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. बलाढ्य पाकिस्तानचं आव्हान ऑस्ट्रेलियन संघाने मोडून काढलं होतं. अशा स्थितीत उपांत्य फेरीचा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

रघुवंशीने उपयुक्त खेळली खेळी

112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आणि शून्य धावांवर हरनूर सिंगची विकेट गमावली. यानंतर आंगक्रिश रघुवंशी आणि उपकर्णधार शेख रशीद यांनी 70 धावांची भागीदारी करत भारताचा मार्ग सुकर केला. रघुवंशीने 65 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीनं 44 तर शेख रशीदने 26 धावा केल्या.

मात्र, ही भागीदारी मोडून काढत बांगलादेशने विकेट घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला. अखेर भारताने 30.5 षटकांत 5 बाद 117 धावा करून सामना जिंकला. कौशल तांबेने शानदार षटकार ठोकत भारताला विजयाच्या दारात नेलं. बांगलादेशकडून रिपन मोंडलने चार बळी घेतले.

बांगलादेशचा संघ 111 धावांत आटोपला

तत्पूर्वी, भारतीय कर्णधार यश धुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध करण्यात भारतीय गोलंदाजांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळं बांगलादेशचा संपूर्ण डाव 37.1 षटकांत 111 धावांत आटोपला.

रवी कुमारने महफिझुल इस्लाम (2), इफ्ताखार हुसेन (1) आणि पी. नवरोज नबिल (7) या तीन आघाडीच्या फलंदाजांना आठ षटकांत बाद केलं. बांगलादेशच्या विकेट पडत राहिल्या आणि 56 धावांपर्यंत सात विकेट पडल्या होत्या.

यानंतर एसएम महरोब आणि आशिकुर जमान यांनी 50 धावांची भागीदारी करत संघाला शंभर धावांच्या पुढं नेलं. महरोबने सर्वाधिक 30 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी आयच मोल्लाने 17 आणि आशिकूरने 16 धावांचं योगदान दिलं. भारताकडून रवी कुमारने सर्वाधिक तीन आणि विकी ओस्तवालने दोन खेळाडूंना बाद केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा