पुणे, ८ सप्टेंबर २०२२ : आशिया चषक २०२२ मधील चौथा सुपर फोर सामना अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा डाव १२९ धावांवर रोखला.
अफगाणिस्ताननं दिलेलं १३० धावांचं आव्हान पाकिस्ताननं अखेरच्या षटकात एक गडी आणि चार चेंडू राखून पार केलं. वेगवान गोलंदाज नसीम शाहनं दोन खणखणीत षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या विजयासह पाकिस्तानने फायनलचं तिकिट पक्कं केले आहे.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानने अफगाणिस्तान संघाला फलंदाजासाठी आमंत्रित केले होते. सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली मात्र त्यांना मोठी खेळी करण्यात यश आले नाही. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी वगळता प्रत्येक फलंदाजाने १० ते २० धावांच्या दरम्यान योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावरील इब्राहिम झादरानने सर्वाधिक ३५ धावा केल्या. पाकिस्तानसाठी प्रत्येक गोलंदाजाने बळी आपल्या नावे केला. रऊफने दोन बळी मिळवले. अफगाणिस्ताने निर्धारित २०षटकात १२९धावा केल्या.
अफगाणिस्तानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती, पण भेदक गोलंदाजी करत त्यांनी पाकिस्तानला चांगलेच वेठीस धरले होते. अफगाणिस्तानने पाकिस्तानपुढे विजयासाठी १३० धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून त्यांनी पाकिस्तानला जखडून ठेवायला सुरुवात केली. पहिल्याच षटकात पाकिस्तानला बाबर आझमच्या रुपात मोठा धक्का बसला. बाबरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यावेळी पाकिस्तानची १ बाद १ धाव अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर पाकिस्तानला एकामागून एक धक्के बसत गेले आणि त्यामुळे पाकिस्तानचा डाव अडचणीत आला. पाकिस्तानचा अर्धा संघ ९७ धावांमध्ये बाद झाला. त्यानंतर १३ धावांमध्ये पाकिस्तानने अजून तीन विकेट्स गमावले आणि त्यांची ८ बाद ११० अशी अवस्था झाली होती. त्यामुळे हा सामना आता कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली होती.
अखेरच्या ६ चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी १२धावांची गरज होती. आणि हातात फक्त एक विकेट… त्यावेळी गोलंदाज नसीम शाहने दोन खणखणीत षटकार मारत सामना जिंकून दिला. अफगाणिस्तानकडून फजल हक आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर राशिद खानने दोन विकेट घेतल्या.
रोमांचक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटनं पराभव केला आहे. पाकिस्तानच्या विजयासह भारताचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव